नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा काळा कायदा मागे घ्या : आडम मास्तर

0
नागरिकत्व दुरुस्ती कायदा
नागरिकत्व दुरुस्ती कायदा

सोलापूर (१९ डिसेंबर) – मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा काळा कायदा आणून देशाच्या संविधानाला नख लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. देशाच्या विविधतेला आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवणारी बाब आहे. या कायद्यामुळे देशात अराजकता माजेल, भारतीय जनता हवालदिल होतील. हा कायदा मागे घ्या नाही तर जनता मोदी अमित शहा यांना धडा शिकवतील. असे मत आडम मास्तर यांनी व्यक्त केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करण्याची मागणी घेऊन माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शन करण्यात आले.

आदाम मास्टर म्हणाले की, संसदेच्या दोन्ही सदनांनी नागरिकत्व (संशोधन) विधेयक पारित केले आहे. भारतीय घटनेची पूर्णपणे पायमल्ली करणारे हे विधेयक भारतीय गणतंत्राचे धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वरूप नष्ट करण्याच्या उद्देशानेच आणले गेले आहे.

धर्मनिरपेक्षतेच्या पूर्णतः विरोधात जाऊन व्यक्तीचे नागरिकत्व त्याच्या धार्मिक संलग्नतेशी जोडणाऱ्या या विधेयकाला डाव्या पक्षांचा तीव्र विरोध आहे. देशाच्या एकता व अखंडतेला हानीकारक असलेल्या सांप्रदायिक विभाजनाची आणि सामाजिक ध्रुवीकरणाची तीव्रता अजूनच वाढवणे हे या विधेयकाचे उद्दीष्ट आहे. या विधेयकाच्या मंजुरी बरोबरच मोदी-शहा सरकारची नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदणीचा विस्तार संपूर्ण देशात करण्याची घोषणा हे भारतीय गणतंत्राचे स्वरूप, धर्मनिरपेक्ष लोकशाहीकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकीय प्रकल्प असलेल्या “हिंदुत्व राष्ट्रात” बदलण्यासाठी उचललेले जुळे पाऊल आहे. डावे पक्ष देशभरातील आपल्या सर्व शाखांना आज नागरिकत्व संशोधन विधेयक व नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी या दोन्हींच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन करीत आहोत.

आजच्या दिवशी भारतीय जनतेला सरफरोशी की तमन्ना गीताच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सामील होण्यासाठी प्रेरित करणाऱ्या राम प्रसाद बिस्मिल यांना गोरखपूर जेलमध्ये फासावर लटकवण्यात आले. त्यांचे सहआरोपी अश्फाक उल्ला खान यांना फैजाबाद जेलमध्ये तर अजून एक सहआरोपी रोशन सिंग यांना नैनी जेलमध्ये फाशी दिली गेली. धार्मिक संलग्नतेच्या पलिकडे घेऊन जाणाऱ्या या एकतेमुळेच भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. आरएसएस-भाजप आज ही एकता भंग करू पाहत असल्याचेही आडम यांनी म्हंटले आहे.

यावेळी माकपचे जिल्हा सचिव अँड एम एच शेख यांनी प्रास्तविक तर सूत्रसंचालन अनिल वासम यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर व्यंकटेश कोंगारी, सिध्दप्पा कलशेट्टी, युसूफ मेजर, रंगप्पा मरेड्डी, म हानिफ सातखेड, सुनंदा बल्ला, नलिनी कलबुर्गी, शेवंता देशमुख, सलीम मुल्ला, सलीम पटेल, लिंगव्वा सोलापूरे, दत्ता चव्हाण, शाम आडम, मल्लेशाम कारमपुरी, अशोक बल्ला, प्रशांत म्याकल, विक्रम कलबुर्गी, दाऊद शेख, नरेश दुगाने, अकिल शेख, बापू साबळे, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, शिवा श्रीराम, विजय हरसुरे, बाळकृष्ण मल्याळ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here