रखडलेली कामे पूर्ण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा : खा.डॉ. अमोल कोल्हे

0
डॉ. अमोल कोल्हे
डॉ. अमोल कोल्हे

पुणे – अनेक महिन्यांपासून रखडलेले मांजरी येथील रस्त्याच्या चौपदरीकरण व काँक्रीटीकरणाचे काम पुढील दीड महिन्यात पूर्ण करा अन्यथा याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.

मांजरी येथील मगर महाविद्यालय ते रेल्वे फाटका पर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण व काँक्रीटीकरणाचे काम जवळपास दोन-अडीच वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्यावरील भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असले तरी रस्त्यात असलेले वीजेचे खांब व डी.पी. स्थलांतरीत करण्याचे काम बऱ्याच काळापासून रखडले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर खा. डॉ. कोल्हे यांनी नुकतीच या रस्त्याच्या कामाची जातीने पाहाणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अभियंते तसेच संबंधित ठेकेदार, सिरम कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सिरम कंपनीच्या सहकार्याने सीएसआर फंडातून या रस्त्याचे काम सुरू असून केवळ सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात परस्पर समन्वय नसल्याने हे काम रखडले आहे. त्यामुळे गेल्या दोन-अडीच वर्षांपासून नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास व मनस्ताप सहन करावा लागतो आहे, याची गंभीर दखल खा. डॉ. कोल्हे यांनी घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थिती पाहून कामातील दिरंगाईबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. तसेच येत्या दीड महिन्यात वीज मंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कामे पूर्ण करावीत अन्यथा मला संबंधितांवर कडक कारवाईची मागणी करावी लागेल असा इशारा दिला.

या बाबतची क्षेत्र पाहणी करताना डॉ. अमोल कोल्हे (खासदार, शिरूर लोकसभा.),श्री.धर्मा नायडू ( सिरम कं. ऑफिसर).,श्री. एच आर चौघुले (सहा.अभि -सा.बा,हवेली),श्री.देवेन मोरे (कनिष्ठ अभि – सा.बा, हवेली),श्री. दांडगे (महावितरण विभाग),निखिल कॉन्स्ट्रुक्शन (रोड कॉन्ट्रॅक्टर),श्री. महेश दांडगे (इतर कार्य. अभि.महावितरण,उपविभाग,पुणे),श्री.जगनाळे (कॉन्ट्रॅक्टर महावितरण )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here