१४ एप्रिल २०२२पर्यंत आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण करू: अजित पवार

0
ambedkar smarak ajit pawar
ambedkar smarak ajit pawar

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाच्या काही परवानग्या रखडल्या आहेत. या परवानग्यांचा केंद्राशी काहीही संबंध नसून राज्यस्तरावरील या परवानग्या आहेत. त्या लवकरच देण्यात येतील आणि येत्या दोन वर्षात म्हणजे १४ एप्रिल २०२२ पर्यंत या स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर अजित पवार यांनी आज इंदू मिलमध्ये येऊन आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली. त्याआधी पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.

इंदू मिलमधील स्मारकाच्या कामात कोणत्याही अडचणी येणार नाही. या स्मारकासाठी काही परवानग्या बाकी आहेत. राज्यस्तरावरच्या या परवानग्या बाकी असून त्या आम्ही लवकरात लवकर देऊ. स्मारकाच्या बाबतीत काही निर्णय मागच्या सरकारमध्ये ठरावीक पातळीवर घेतले होते. कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता देण्यात आली नव्हती. आम्ही लवकरच या निर्णयाला कॅबिनेटमध्ये मान्यता देऊ. स्मारकाच्या परवानग्यांपासून ते इतर गोष्टी या महिन्यातच पूर्ण करण्यात येणार येईल. स्मारकासाठी जितका निधी लागेल तेवढा देण्यात येणार असून १४ एप्रिल २०२२पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले. मी कुणाच्याही कामाचं ऑडिट करायला आलो नाही. कामाची पाहणी करायला आलो आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here