महावितरणच्या गलथान कारभारामुळे वडाचीवाडी येथील शेतकर्‍याचे नुकसान

0
mahavitaran
mahavitaran

महावितरणच्या गलथान कारभारामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून एका शेतकर्‍याच्या शेतात वीज नसल्यामुळे शेतातील पिक उन्हामुळे करपून चालले आहे. याकडे महावितरणने ताबडतोब लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन फलटन तालुक्यातील वडाचीवाडी येथील शेतकरी शंकर पवार यांनी आसू येथील महावितरणच्या शाखा कार्यालयातील अभियंते थोरात यांना देण्यात आले आहे.

फलटण तालुक्यातील वडाचीवाडी (हणमंतवाडी) येथील शेतकरी शंकर पवार यांच्या शेतातील जनित्राची केबल उस तोडणार्‍या ट्रॅक्टरच्या चाकाने 3-4 दिवसांपूर्वी तुटली आहे. परिणामी शेतातील पिकाला देण्यात येणार्‍या पाण्याच्या मोटारीचा पंप बंद ठेवण्यात आला आहे. शेतामध्ये सध्या कांद्याचे बियाणे पेरले असून पाण्याअभावी उन्हामुळे त्याचे कोंब करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतातील उस बांधून केव्हाच झालेला असताना महावितरण कार्यालयाला वारंवार कळवूनसुद्धा त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सातारा जिल्हा हा विजेचे माहेरघर मानला जातो. मात्र याच जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेतीसाठी जर वेळीच वीज पुरवठा झाला नाही तर पिकाला पाणीपुरवठा कसा होणार? खरे तर ‘ठाकरे सरकार’ने शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्यासोबत त्यांना उद्भवणार्‍या समस्यांकडेही लक्ष देण्याची नितांत गरज आहे. महावितरणचा कारभार हा अतिशय ढिसाळ बनत चालला आहे. आता शासनाने त्यांना दणका दिलाच पाहिजे. गोरगरीब शेतकर्‍यांना भरमसाठ बिले आकारली जातात. महावितरण कार्यालयाकडून मीटरचे योग्य रिडिंगसुद्धा केले जात नाही. मात्र वीजबिले ही वारेमाप येतात. शेतकर्‍यांनाही ती देणे बंधनकारक असते. ‘नाक दाबून बुक्क्यांचा मार’ अशी अवस्था सध्या बळीराजाची झालेली आहे. महावितरणच्या या गलथान कारभाराला आम्ही तीव्र निषेध करतो.

-मदन साबळे, सामाजिक कार्यकर्ते, वडूथ सातारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here